पंढरपूर: आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपुरात देवाच्या दर्शनासाठी येतात. हे भाविक मिळेल त्याठिकाणी राहतात. भाविकांनी धोकादायक इमारतीत राहिल्यास कोणतीही आपत्तीजनक घटना घडल्यास जीवितहानी होऊ शकते. यामुळे २९ जून ते १० जुलै २०२५ या कालावधीत अतिधोकादायक इमारती, मठांचा वापर करण्यास तसेच त्याठिकाणी राहण्यास प्रतिबंध करण्यात येत असून, याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी जारी केले आहेत.आषाढी यात्रा सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळे पंढरपूरला येतात. त्यासोबत लाखो भाविक पंढरपूरला पालखी सोहळ्यासोबत येतात. या भाविकांची यात्रा सुलभ व सुरक्षितपणे पार पडणे, याला प्रशासनाकडून प्रथम प्राधान्य दिले आहे. पंढरपूर शहरात यात्रा सोहळ्यासाठी विविध भागातून येणारे भाविक/वारकरी हे यात्रा कालावधीत पंढरपूर शहरातील मठ, वाडे, इमारती आदी ठिकाणी वास्तव्य करतात. त्यापैकी काही इमारती, मठ बंद व जुने आहेत. यात्रा कालावधीत भाविक त्याठिकाणी वास्तव्यास राहतात. बंद असलेले तसेच जुन्या इमारती व मठ यांचे कोणत्याही प्रकारचे परीक्षण झालेले नाही.
त्यापासून मानवी जीवितास धोका होऊ शकतो. यात्रा कालावधीत पंढरपूर शहरातील धोकादायक इमारती, मठ यांच्यापासून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच भाविकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारीत करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) मला प्राप्त अधिकाराचा वापर करून उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी हे आदेश जारी केले आहेत.
