पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व पनि रसर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शन रांग, पत्रा शेड आदी ठिकाणांतील घटना, घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने कायम स्वरुपी व तात्पुरत्या स्वरूपात असे एकूण १५० ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे. दर्शन रांगेतील घुसखोरी, तात्काळ आरोग्य व्यवस्था, अनुचित प्रकार घडू नये व इतर घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.याशिवाय, नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकी द्वारे संवाद साधून तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्हीची खूप मोठी मदत होत आहे. याशिवाय, कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या कार्यालयात देखील या कॅमेऱ्यांचा अक्सेस दिला असल्याने त्यांना मुख्यालयात बसून सर्व घडामोडी पाहता येत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे परीक्षण करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री संत तुकाराम भवन येथे असे दोन नियंत्रण कक्ष केले आहे. त्याची जबाबदारी विभाग प्रमुख राजेंद्र घागरे यांचेकडे आहे.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आयपी, अनॉलॉग व मेगापिक्सल नाईट व्हिजनचे अत्याधुनिक कॅमेरे आहेत. या सर्व कॅमेराद्वारे चित्रित केलेला डाटा देखील सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
