अकलूज – दिंड्या पताका, खांद्यावरी भार, विठ्ठल नामाचे सार, हृदयी धरे. ज्ञानियांचा राजा, तुका पंढरीसी, भेटीची मानसी, आस लागली.सराटी येथील मुक्काम आटोपून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निरास्नान करण्यासाठी निरा नदीकडे मार्गस्थ झाला. निरास्नान झाल्यानंतर सकाळी सव्वाआठ वाजता पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या ठिकाणी प्रवेश केला. येथे पालखी सोहळ्याचे स्वागत केल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी उत्साहात पार पडला.सोहळ्याचा गोल रिंगण सोहळा प्रारंभी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खा. धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ अकलूज नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे आदीनी जगदुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत केले.पालखी सोहळा अकलूज येथील गांधी चौकात आल्यानंतर अकलूज नगरीच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सौ नंदिनीदेवी मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, जनसेवाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील परिवारातील सदस्य, अभिनेत्री रिंकू राजगुरू आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या भव्य मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो वारकरी, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. भक्ती आणि उत्साहाच्या या वातावरणाने संपूर्ण अकलूज नगरी दुमदुमून गेली होती.रिंगण सोहळ्याची सुरुवात पालखीच्या विधिवत पूजनाने झाली. त्यानंतर पालखीसोबत असणाऱ्या मानाच्या अश्वांचे पूजन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील व त्यांच्या पत्नी ऋतुजा देवी मोहिते पाटील, चिरंजीव सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिंड्या-दिंड्यांतील वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने मैदानाभोवती गोलाकार उभे राहिले. ज्यामुळे मध्यभागी अश्वांना धावण्यासाठी मोकळी जागा मिळाली.
