शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार मनीषा कायंदे यांनी पंढरपूरच्या वारीमध्ये ‘अर्बन नक्षली’ शिरल्याचा गंभीर आरोप केला. हा दावा केवळ ऐकीव नसून यामागे ठोस पुरावे असल्याचे त्यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी हे आरोप केले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
मनीषा कायंदे यांनी सांगितले, की ”राज्यभरात अत्यंत सांप्रदायिक वातावरणात सुरू असलेल्या पंढरपूरच्या वारीमध्ये अन्य धर्मीय, नास्तिक आणि नक्षलवादाशी संबंधीत आरोप असलेले विविध लोक व ‘लोकायत’ सारख्या अनेक संस्थांचे लोक सहभागी होवून पथनाट्य अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे संत साहित्य व संतांच्या विचारांची मोडतोड करून साध्याभोळ्या वारकऱ्यांचा बुद्धीभेद करीत असल्याचे वारकरी संस्थांचा आरोप आहे. अशा व्यक्ती व संस्थांवर शासनाने योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी पॉइंट ऑफ इनफार्मेशनच्या माध्यमातून आज विधानपरिषद सभागृहात केली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीचे पवित्र्य व वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत अश्या व्यक्ती व संस्थांची गृहविभागामार्फत तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. ”
